जामिनावर सुटल्यानंतर साक्षीदारांना धमकावणाऱ्या सात आरोपींना केले पुणे पोलिसांनी जेरबंद

arrested

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सचिन शिंदे कॉल प्रकरणाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर साक्षीदारांना धमकावणाऱ्या सात आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.सापळा रचून मोठ्या शिताफीने पोलिसांनी ही कामगिरी केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तुल, दोन कोयत्यांसह हत्यारे जप्त केली आहेत.

प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (२१, रा. लोणीकंद), गणेश दिनकर दाते (३०, रा. दातेमळा), ऋतिक काळूराम शिवले (१९, रा. लोणीकंद), रोहित दत्ता मंजूळे (१९, रा. वाघोली), आकाश राजू दंडगुले (वय २०), आदित्य राजाराम डफळ (वय २१, रा. शिरूर) आणि मनोज लक्ष्मण साळवे (वय ३१, रा. भोसरी) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि लोणीकंद परिसरात गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या सचिन शिंदे याचा आरोपींनी खून केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी वरील सातही आरोपींना अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले होते. दरम्यान जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपींनी या खून प्रकरणातील साक्षीदारांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली होती. गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार आली होती.

त्यानंतर मागील सात दिवसांपासून या आरोपींवर गुन्हे शाखेचे पोलिस पाळत ठेवून होते. दरम्यान सचिन शिंदे खून प्रकरणात ते शिवाजीनगर न्यायालयात हजर होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या सातही जणांना सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि इतर घातक शस्त्र जप्त केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here