दोन हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : दोन हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरुंग रक्षकाला जळगाव अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई सोमवारी (दि.१५) दुपारी एकच्या सुमारास केली. अनिल लोटन देवरे या तुरुंग रक्षकाचे दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्याच्या या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहेत. कैद्याला भेटू देण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरुंग रक्षक अनिल देवरे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने पडताळणी करुन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भुसावळ कारागृहात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये घेताना देवरे यांना पंचासमक्ष अटक केली. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here