अलिबाग (प्रतिनिधी उमाजी केळुसकर) : लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील ६५ हजार लोकांची तपासणी, ६ हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील ४५०० मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाऊंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे प्रशंसोद्गार लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर व्ही.पी. नंदकुमार यांनी काढले.
लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबाग अद्ययावत नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व नेत्रचिकित्सक प्रशिक्षण केंद्र सोगाव येथे उभारत आहे. या सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठीचे भूमीपूजन रविवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०-३० वाजता करण्यात लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर व मणीप्पुरम गोल्ड कंपनीचे मालक व्ही.पी. नंदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर एलसीआयएफ कॅम्पेन १०० एरिया लीडर हनुमान अगरवाल, मल्टिपल कौन्सिल चेअरमन राकेश चौमल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन तावरी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-१ मुकेश तनेजा, डिस्ट्रिक गव्हर्नर-२ अमरचंद शर्मा यांच्यासह लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष नितीन अधिकारी, सचिव प्रवीण सरनाईक, रिजन चेअरमन अरविंद घरत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना व्ही.पी. नंदकुमार यांनी या सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रपेढी, डायबेटीसवर उपचार, डायलेसिसची सोय, तसेच इतरही वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी हनुमान अगरवाल, राकेश चौमल, अनिल जाधव, लुनकरन तावरी, प्रवीण सरनाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार डिस्ट्रीक ट्रेझरर अनिल म्हात्रे यांनी मानले. या समारंभासाठी माजी प्रांतपाल बाबुराव पिसाळ, अशोक जोशी, राजेश प्रजापती, ओमप्रकाश अरोरा, के.जे. पाॅल, डाॅ. जयंत पारेख, संतोष चौहान, आरडीसीसी बॅंकेचे सीईओ प्रदीप नाईक, नयन कवळे, प्रदीप सिनकर, प्रवीण घरत, माजी सरपंच सुनील थळे, मापगाव उपसरपंच कुर व सदस्य, लायन्स क्लब अलिबाग, मांडवा, पोयनाड, डायमंड, पनवेल, पेण, नागोठणेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन डाॅ. प्रिती प्रधान यांनी केले.






