नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहरात विविध चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये एकूण ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याची माहिती समोर आली आहे. सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
पहिल्या घटनेत, नांदूर गाव येथील मधुगिरी कॉलनी येथे राहणारे मिलिंद हिरगुडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली आहे. अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, पळसे येथील साई विश्व अपार्टमेंट येथे राहणारे भास्कर कातकाडे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी ६१ ग्राम सोने आणि २५ हजारांची रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली आहे. अधिक तपास नाशिकरोड पोलीस करत आहे.
तिसऱ्या घटनेत, अशोकनगर येथे राहणारे किरण साळवे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत ६० हजार रकमेचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत. चौथ्या घटनेत पाथर्डी फाटा येथील आयकर कॉलनी येथे गणराज रो हाउसमध्ये राहणारे किरण पुरकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडत प्रवेश करत १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.







