नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये केळवंडी गावाच्या हद्दीत मालट्रक उलटून झालेल्या अपघातात क्लीनर रवींद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड (वय २४ रा डोमेगाव ता.अंबड जि. जालना) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अतुल शेळके, ईश्वर गर्जे, वाहन चालक राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. बारामतीहून कांदा घेऊन जालन्याकडे जाणारा दहा चाकी मालट्रक (क्रमांक एमएच २१ एक्स २९९) गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या धोकादायक वळणावर उलटला. या घटनेत गाडीतील क्लीनर रवींद्र उर्फ रविराज खंडेभराड गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.
अपघातानंतर मृत रवींद्रला ट्रकखालून काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मयत रवींद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून ट्रकचालक संदिप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश म्हस्के करत आहेत.






