अहमदाबाद (गुजराथ) : लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा आश्रम पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हैदराबादहून अहमदाबादच्या साबरमती भागातीलआश्रमात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचे आई-वडील त्याच्या शोधात भटकत आहेत. आश्रमाने या तरुणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
आसाराम बापूचा भक्त २७ वर्षीय राहुल (नाव बदलले आहे) ३ नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रांसह साबरमती परिसरातील आसाराम आश्रमात आला होता. मित्र परत आले होते, पण राहुल इथेच थांबला. बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याचे पालक त्याच्या शोधात अहमदाबादला पोहोचले आणि त्यामुळे तो बेपत्ता झाल्याचे उघड झाले.
२००८ मध्ये दीपेश आणि अभिषेक नावाचे दोन भाऊही या आश्रमातून बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी दोघांचेही मृतदेह सापडले. दोन्ही भाऊ आश्रमातील गुरुकुलातच शिक्षण घेत होते. त्यावेळचे पोलीस आयुक्त डीके त्रिवेदी यांच्या अहवालाच्या आधारे सरकारने या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, मुलांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले नाही.
उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जोधपूर पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन मुलीचे आई-वडील आसाराम भक्त होते. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आसाराम बापूवर जातीचा छळ, खून, धमकी देऊन जमीन बळकावण्याचे आरोपही आहेत.






