नक्षल्यांना शस्त्रे पुरविणाऱ्या सीआरपीएफ जवानाला केली अटक

रांची (झारखंड) : येथील दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवादी संघटना आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांना शस्त्रे आणि काडतूस पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सीआरपीएफ जवानासह तीन जणांना अटक केली आहे. अविनाश कुमार उर्फ चुन्नू असे या जवानाचे नाव आहे. अविनाशसह ४९ वर्षीय ऋषी कुमार आणि मुजफ्फरपूर येथील ४८ वर्षीय पंकज कुमार सिंह यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

एटीएस पथकाने चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींनी नक्षलवादी संघटना आणि गुन्हेगारी टोळ्यांना एके ४७, रायफली आणि काडतुसे पुरवली आहेत. या टोळीकडून गुन्हेगारी टोळ्यांनाही शस्त्रे पुरवली गेली आहेत. त्यात अमन साहू टोळीचा समावेश आहे. या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने साडेचारशे जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

एटीएसचे पोलीस अधीक्षक प्रशांत आनंद यांनी सांगितले की, अटकेत असलेला आरोपी अविनाश कुमार उर्फ चुन्नू हा सीआरपीएफचा जवान आहे. तो पुलवामामध्ये तैनात होता. चार महिन्यांपासून तो सेवेत रूजू झाला नव्हता. तो २४ ऑगस्ट २०११ रोजी मोकामा ग्रुप सेंटरमधून सीआरपीएफमध्ये भरती झाला होता. यापूर्वी आरोपी जवान हा लातेहार आणि जगदलपुरमध्ये तैनात होता. २०१७ पासून तो पुलवामामध्ये तैनात होता, अशी माहिती मिळाली आहे.

आरोपी रांचीचा कुख्यात गुंड अमन साहू, बिहारच्या गयामधील गुंड हरेंद्र यादव आणि चतराच्या लल्लू खानच्या संपर्कात होता. हरेंद्र यादव आणि लल्लू खान सध्या शेरघाटी आणि गया येथील तुरुंगात कैद आहेत. अटकेतील ऋषी कुमार हटियामध्ये वाहतूक व्यावसायात काम करत होता. तसेच रांचीमध्ये एका इमारतीचे बांधकाम करत होता. त्याचवेळी चाईबासा-सरायकेलामध्ये रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार संजय सिंह आणि मुहाहिरर यांच्या संपर्कात आला होता. दोन्ही ठेकेदारांना नक्षलवाद्यांना काडतुसे, गोळ्या पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here