ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : दक्ष नागरिकांच्या सतर्कमुळे कल्याण पश्चिम परिसरातील फोर्टीस् रुग्णालय परिसरात मुंगूसाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून, ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी तातडीने कल्याण वनखात्याकडे गुन्हा वर्ग करीत संजू समय्या मोटम (वय ३२), भोलानाथ शंकर पास्तम (वय ३०), जलाराम समय्या पास्तम (वय ३२), बसवय्या शंकर पास्तम (वय ३२) आदी चार आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. तर आरोपींना एक दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड या ठिकाणी राहणारे आहेत..
या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले. सांधेदुखीवर मुंगूसाचे तेल औषध म्हणून वापरण्यात येते. तसेच मुंगूसाच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. तसेच मुंगूसाला बाजारात चांगली किंमत मिळते. या चार जणांनी मुगंसाची शिकार करून हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज सुत्रांनी वर्तविला आहे.
कल्याण वन खात्याचे वन परिक्षेत्र आधिकारी संजय चन्ने यांनी आरोपींना ताब्यात घेतले. मुंगूस ही संरक्षित प्रजाती मोडत असल्याने चारही आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना एक दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी वन परिक्षेत्र आधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनखाली एम. डी. जाधव आणि त्यांचे वनरक्षक हे अधिक तपास करत आहेत.






