मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली असून, यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. ही आग इतकी भीषण आहे की, आसपासच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पहायला मिळत होते. तसेच धुराचे लोट हे २० ते ३० फुट उंचावर जाताना सुद्धा दिसून येत होते.
गाड्या जळून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज या आगीत शोरूममधून मोठं मोठ्या स्फोटाचे आवाज होत होते. तर या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.






