पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वनक्षेत्रातील वाळली लाकडे नेणाऱ्यांना पकडत, कारवाई न करण्यासाठी 1 लाखांची लाच घेताना वनविभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
यावेळी पोलिसांनी तब्बल एक लाखांची रोकडीही जप्त केली आहे. वन अधिकाऱ्या बाबत देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गेल्या आठ दिवसापासून वनपाल आणि वनरक्षकच्या भोवती लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. वनविभागाच्या शिरूर येथील कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाकूड वाहून नेणाऱ्या दोन पिकअप गाड्या एक नोव्हेंबर रोजी वनविभागाने पकडल्या होत्या. पिकअपच्या वाहतूकीस परवानगी नाही. त्यामुळे कारवाई पासून वाचायचे असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी तक्रारदारकडे करण्यात आली. एक लाख न दिल्यास करावाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यानं पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज लाचलुचपत विभागाने सापळा रचून वनपाल सागर भोसले (वय ३४) व वनरक्षक संजय भोसले (वय ४५) त्यांच्यावर कारवाई करत अटक केली आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलिस उपायुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यावेळी एक लाखांच्या रक्कमेसह वनपाल आणि एक वनरक्षक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.






