पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भडवली येथे ३५ ते ४५ लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि.१८) भडवली गावात काकडा आरती समाप्तीचा काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम झाला होता. यावेळी लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या जेवणातून विषबाधा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला आहे. बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेश आहे.
रुग्णालयातील तीनही वॉर्ड फुल झाल्याने काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ. इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाटील, डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ. पोपट आधाते, डॉ. शिवराज वाघमारे रुग्णांवर उपचार करीत आहेत.






