नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा शहरात होत आहे.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. अमोल इघे हे भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष होते. अमोल यांना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यानंतर ते सातपूर एमआयडीसीमधील कार्बन नाका परिसरात आले. तेथे त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. युनियनच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या ५ दिवसात नाशिक शहरात हत्येची ही तिसरी घटना आहे.या महिन्याच्या सुरुवातीला आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती.






