आरे पोलिसांनी केली १५ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : येथील आरे पोलिसांनी ५ किलो ६५ ग्राम व्हेल माशाची उलटी अंबरग्रीस जप्त केली आहे. या उलटीची बाजारात किंमत सुमारे १५ कोटी रुपये इतकी असून, याप्रकरणी योगेश जोशी याला पोलिसांनी अटक केली आहे. आरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती की, योगेश जोशी हा तरुण आरे परिसरात व्हेल माशाची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी एक टीम तयार केली आणि आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. योगेश जोशी व्हेल माशाची उलटी घेऊन ठरलेल्या ठिकाणी युनिट क्रमांक ५ आरे मार्केट आरे कॉलनी येथे आला. याठिकाणी एक इसम हातात टिफिन बॅग घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या इसमास हटकले असता तो पळून जाऊ लागलावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करत पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी योगेश जोशी याच्यावर कलम २(१६)(सी), ९, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१, वन्यजीव संरक्षण कायद्या १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माशाच्या उलटीचा वापर द्रव पदार्थ आणि औषध तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीची बाजारात किंमत अधिक आहे. मात्र ही उलटी बेकायदेशीर विकणे गुन्हा आहे. सदर कारवाई प्रविण पडवळ, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि ज्योती देसाई, पोनि संजय परदेशी, पोउनि उल्हास खोलम, पोना गौतम बडे, पोशि अंबादास भाबड, बिनल शिंगाणे, पंकज ढोक, नागराज गोडसे, भावेश जानराव, अक्षय काटे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here