पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पुणे – सोलापूर महामार्गावरील इंदापूर येथील बाह्यवळण मार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक गतिरोधकावर आदळल्याने पाटे तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्याच्या अंगावर गेल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये फळ विक्रेता महिलेसह दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास भिमाई आश्रम शाळेजवळील शिंदे वस्ती चौकात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथून तुळजापूरला देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस इंदापूर बाह्यवळन महामार्गालत चहापानासाठी थंबली होती. बसमधील दोन लहान मुले ही शेजारी विक्रेत्याकडून पेरू विकत घेत होती. त्याचवेळी गतीरोधकावर ट्रक आदळून त्याचे पाटे तुटले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोन लहान मुले गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्तांना खासगी वाहनातून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अकलूज येथे पाठविले आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.






