वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तलाठ्याची आत्महत्या

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ४१,रा.सातारा ) या तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण बोराटे यांना गेल्या काही दिवसापासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्रास देण्यात येत होता. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या बोराटे यांनी शनिवारी रात्री उशिरा छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने बांधून गळफास घेतला. रविवारी सकाळी बोराटे लवकर न उठल्यामुळे यांच्या आईने बोराटे यांच्या आतेभावाला त्यांना उठविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी बोराटे यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर बोराटे यांच्या आईने व नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बोराटे यांच्या घराचा दरवाजा तोडला. तेव्हा बोराटे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ फासावरून खाली उतरवून उपचारासाठी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यता घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी सायंकाळी उशिरा बोराटे यांचा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here