लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसेन) : ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानाचे सुटे भाग घेऊन निघालेला ट्रक ट्रफिकमध्ये अडकल्याची संधी साधत चोरटय़ांनी आतमधील विमानाचा टायरच पळवून नेला. विमानाच्या इतर महत्त्वाच्या सुटय़ा भागांना चोरटय़ांनी हातही लावला नाही. या अजब प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत.
ट्रकचालक हेमसिंह रावत यांनी यासंदर्भात पोलीत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर रोजी रावत हे बक्षी का तालाब परिसरातील एअरबेसवरून ट्रकमधून मिराज विमानाचे नवे सुटे भाग घेऊन जोधपूरला निघाले होते. लखनौजवळच्या शाहीन पथ येथील आशियाना परिसरात त्यांचा ट्रक ट्रफिक जॅममध्ये अडकला. बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने काही लोक त्यांच्या ट्रकमधील सामान काढत असल्याचे सांगितले.
हेमसिंग रावत हे ट्रकमधून उतरून पाठीमागे जात असतानाच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी तिथून वेगाने जाताना त्यांना दिसली. स्कॉर्पिओच्या मागचे दार उघडे होते आणि त्यातून बाहेर काहीतरी लटकताना रावत यांना दिसले. ट्रकमध्ये चढून त्यांनी पाहणी केली तेव्हा आतील सहा टायर्सपैकी एक जागेवर नव्हता. टायर बांधलेला नायलॉनचा दोर कुणीतरी कापला होता. रावत यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली.
रावत यांच्या ट्रकमध्ये टायर्सशिवाय मिराज विमानाचे एक रिफ्युलर व्हेईकल, दोन बॉम्ब ट्रॉली, एक युनिव्हर्सल ट्रॉली, सहा नोज टायर, दोन शिडय़ा, दोन सीओटू ट्रॉली आणि इतर सुटे भाग होते. पण ते सर्व सामान जागच्या जागी होते. फक्त एक टायर चोरीला गेला होता. नायलॉनच्या दोरीने टायर्स बांधले होते. त्यामुळे ती दोरी कापून टायर चोरून नेणे चोरटय़ांना सोपे गेले असे रावत सांगतात.






