मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; ३८ मोबाईलसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पीएमटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ३८ मोबाईल आणि एक महागडी चारचाकी गाडी असा एकूण १५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई स्वारगेट पीएमटी बस स्टॉपजवळ केली.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना परराज्यातील एक व्यक्ती इर्टिगा गाडीतून येऊन बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वारगेट पीएमटी बस स्टॉपजवळ सापळा रचून एका लाल रंगाची इर्टिगा (केए ०३ एनएफ १८२४) मधील नागेश आप्पाना (वय२५ रा. मशिद कॉलनी ता. गुत्ते जि. गतकुल, आंध्र प्रदेश) या व्यक्तीला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता त्याच्याजवळ वेगवेगळ्या कंपन्यांचे ४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ३८ मोबाईल, त्याचे स्वत:चे २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि १० लाखांची गाडी असा एकूण १५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान नसल्याने दुभाषिकामार्फत चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने हे मोबाईल कात्रज चौक, पुणे मनपा बस स्टॉप व इतर ठिकाणाहून पीएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ९ गुन्हे उघडकीस आणले असून इतर मोबाईल मालकांचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here