कोडेन फॉस्पेट हा अमली पदार्थ मिसळून कफ सिरपची नशेसाठी विक्री करणारा जेरबंद

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : कोडेन फॉस्पेट हा अमली पदार्थ मिसळून कफ सिरपची नशेसाठी विक्री करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने डोंगरी येथून अटक केली. अर्शद अक्रम शेख असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून अमली पदार्थमिश्रित कफ सिरपच्या तब्बल साडेतीन हजार बाटल्या हस्तगत केल्या आहेत. अर्शद मुंबई, तसेच उपनगरांत नशेसाठी या सिरपचा पुरवठा करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर यूनिटच्या प्रभारी पोलिस निरीक्षक लता सुतार, सहायक निरीक्षक फरीद खान, उपनिरीक्षक पालवे, भालेराव, चिकणे यांच्या पथकाने माझगावच्या इंदिरानगर चाळीतून अर्शदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोडेन फॉस्पेटमिश्रित कफ सिरपच्या १२० बाटल्या सापडल्या.

अर्शद हा मुंबईच्या कानाकोपऱ्यांत कफ सिरपच्या बाटल्यांचा पुरवठा करीत असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने डोंगरी येथील एका गाळ्यामध्ये कफ सिरपचा साठा करून ठेवला असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तीन हजार ४८० बाटल्या हस्तगत केल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर कफ सिरप त्याने आणले कुठून याचा शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here