पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : जिल्ह्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका लॉजवर छापा टाकून केलेल्या कारवाईत पोलिसांनी १० महिलांची सुटका केली आहे. यामध्ये काही विदेशी आणि परराज्यातील तरुणींचा समावेश आहे.
पोलिसांनी या कारवाईत २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून लॉज मालकासह मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाकडून करण्यात आली. लॉजचा मॅनेजर गवी रंगा कृष्णा गोवडा (वय-३८ रा. किवळे, मूळ रा. भोईसर, मुंबई) आणि लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय-४० सध्या रा. कात्रज, मूळ रा. उडपी, कर्नाटक) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेट्टी हा आपल्या लॉजमध्ये काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून मुंबई-बेंगळुरु महामार्गालगत असणाऱ्या किवळे येथील द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापेमारी केली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १० तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये एका परदेशी तरुणीसह ६ परराज्यातील आणि ३ महाराष्ट्रातील तरुणींचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून ११ हजार ४०० रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ३०० रुपये किंमतीचे इतर साहित्य असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.






