भरधाव कारच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका कुटुंबाला भरधाव वेगात आलेल्या एका कारने धडक दिली. यामध्ये पती-पत्नी जखमी झाले. तर त्यांचा सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. ८) पहाटे साडेचार वाजता काळेवाडी फाटा येथे घडला.



संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कनवरलाल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगा संघर्ष असे तिघेजण काळेवाडी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी पुण्याकडून सर्व्हिस रोडने एक कार भरधाव वेगात आली. कारने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांचा मुलगा संघर्ष गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संघर्षचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here