रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत चोरटा पुणे गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : शहरातील विविध भागात रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून एक रिक्षा आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील भवानी पेठेतील संत राहिदास उद्यानाजवळ करण्यात आली आहे. बुऱ्हान सादिक शेख (वय-१९ रा. गफुर तकीया, सहारा कॅम्प, घोरपडी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.




गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारी (दि.७) हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना माहिती मिळाली की, सराईत वाहन चोर भवानी पेठेतील राहिदास उद्यानाजवळ वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला युनिट कार्यालयात आणून सखोल चौकशी केली.



चौकशी दरम्यान आरोपीने त्याचा साथिदार मोसीन उर्फ मन्या अब्बास शेख (वय-३० रा. चाँद ताराचौक, गंजपेठ पुणे) याच्या मदतीने रिक्षा आणि दुचाकी चोरल्याची कबुली देऊन १ लाख ५ हजार रुपये किंमतीची एक रिक्षा आणि तीन दुचाकी पोलिसांना दिल्या. पोलिसांनी जप्त केलेली रिक्षा आणि दुचाकी खडक आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी मोसीन शेख हा हद्दपार असून तो १४ नोव्हेंबर पासून येरवडा जेलमध्ये आहे. मोसीन शेख याच्यावर चेन स्नॅचींग, घरफोडी, वाहन चोरी असे 15 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अनिकेत बाबार, सतीश भालेकर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अशोक माने, शशीकांत दरेकर,अजय जाधव, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here