कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) :- दानोळी (ता. शिरोळ) येथील बेपत्ता असलेल्या त्या युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रशांत संजय भिसे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी सकाळी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.
दरम्यान, खूनप्रकरणी एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोणत्या कारणातून खून झाला, याचा तपास सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रशांत भिसे हा १५ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घरातून निघून गेला होता. बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली होती. दरम्यान, दानोळी येथील एका विहीरीत प्रशांत याची मोटरसायकल आढळून आली होती. मात्र, प्रशांत मिळून आला नव्हता. शुक्रवारी दानोळी-कोथळी मार्गावरील मंगोबा देवालय रस्त्यालगत त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कच-याच्या ढिगा-यात मिळून आला. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला.






