पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : दारु पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून मित्राने आपल्याच मित्राचा लाकडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) राजगुरुनगर येथे घडली आहे.
ही घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. रामदास सोपान थिटे (वय-27 रा. सडकवस्ती रेटवडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आठ तासात अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. नितीन काळूराम काशिद (वय-42 रा. खरपुडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खेड-कनेरसर मार्गावर खरपुडी गावच्या हद्दीत हॉटेल माथेरान गारवा येथे मयत रामदास आणि त्याचा मित्र दत्तात्रय टाकळकर हे दारु पित बसले होते.
दरम्यान आरोपी नितीन काशिद हा दारुच्या नशेत पुन्हा दारु पिण्यासाठी आला होता. त्याने मयत रामदास याला दारु पिण्यासाठी 20 रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने रामदासला शिवीगाळ (Pune Crime) केली. रामदास आणि त्याचा मित्र टाकळकर हे दारुच्या नशेत रस्त्यावर आले असताना आरोपी काशिद याने लाकडी दांडक्याने थिटे याच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन थिटे याचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय टाकळकर हा जखमी झाला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात होता.
पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष घोलप, सचिन गिलबिले, मोहन अवघडे, स्वप्नील गाढवे, निखील गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा शोध घेतला.






