ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्ण बंदी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असून राज्य सरकारने कठोर पावले टाकत शुक्रवारी नव्याने अनेक निर्बंध लागू केले आहेत. याबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या असून त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेनेही रात्री उशिरा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मोकळ्या वा बंदिस्त जागेत एकत्र येऊन कोणतीही पार्टी वा अन्य कार्यक्रम करण्यास मनाई असेल असे नमूद करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून (२५ डिसेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रात हे आदेश लागू असणार आहेत.

मुंबईत थर्टी फर्स्टच्या रात्री जल्लोष पाहायला मिळतो. गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी तसेच इतर ठिकाणी मोठी गर्दी उसळते. त्याचवेळी पंचतारांकित हॉटेल्स व अन्य ठिकाणीही न्यू ईयर पार्ट्यांची रेलचेल असते. ओमिक्रॉनचा धोका पाहता हे सेलिब्रेशन संसर्गाचा अधिक फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने कठोर पाऊल उचलत या सेलिब्रेशनला प्रतिबंध केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांनी आदेश जारी केला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात नववर्षानिमित्त कोणताही कार्यक्रम, समारंभ, पार्टी, संमेलन आयोजित करण्यात पूर्णपणे मनाई असेल. बंदिस्त वा मोकळ्या जागेत असे कोणतेही आयोजन करता येणार नाही. त्यासोबतच राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व गाइडलाइन्सही मुंबईत लागू असणार आहेत. हा आदेश आज (२५ डिसेंबर) मध्यरात्रीपासून मुंबई महापालिका क्षेत्रात लागू असेल, असे चहल यांनी नमूद केले आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून आदेशाचा भंग केला गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही चहल यांनी बजावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here