वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून ग्राहकाचा दापोडीमधील महावितरण कार्यालयात राडा

arrested

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वीजबील भरले नसल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून एका ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना शिविगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना महावितरणच्या दापोडी कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी ग्राहकाविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ललीता अनिल कुटे (वय-४५ रा. आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आदर्श शिंदे (रा. काटे रेसीडन्सी बिल्डिंग, दापोडी, पुणे) याचेविरुद्ध कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महावितरण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत दापोडी शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २३) दापोडी येथील काटे रेसिडेन्सी मधील थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दुपारी सर्व कर्मचारी दापोडी कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी आदर्श शिंदे याने कार्यालयात येऊन काटे रेसिडेन्सीमधील घराचा वीजपुरवठा का खंडित केला असे जोरजोराने ओरडून शिवीगाळ सुरु केली.

त्याने एका महिला कर्मचाऱ्याकडून थकबाकीदारांच्या नावाची यादी व मोबाईल हिसकावून घेतला व फेकून दिला तसेच कार्यालयातील सर्वांना दमदाटी केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here