पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा एका 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चितळे लेनजवळ रक्ताच्या थारोळयात तरूण पडला होता. त्यास तातडीने रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल राजेंद्र जाधव नावाच्या 20 वर्षीय तरूणाचा भरदिवसा तलवारीने सपासप वार करून खून झाला आहे. अनिलची बहिण कर्वेनगर परिसरातील फक्कड हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करते. तो तिला सोडण्यासाठी आला असताना ही घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनिल जाधव याच्यावर तिघांनी तलवारीने सपासप वार केले आहेत. काही क्षणातच तो रक्ताराच्या थारोळयात पडला. जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, याबाबत शहर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळापुर्वीच खबर आली असल्याचे सांगितले.
परिसरातील CCTV फुटेजमध्ये काही कैद झाले आहे काय हे देखील पोलिस तपासत आहेत.
भरदिवसा पुण्यात 20 वर्षीय तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनिल जाधवचा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.






