अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : १०० कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांना १० जानेवारीपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या ५५ दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना १५ दिवस ‘ईडी’ कस्टडीमध्येदेखील ठेवले होते. त्यानंतर आलेले देशमुख यांना १२ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत कस्टडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आज १३ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कस्टडी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here