ताडीच्या अतिसेवनामुळे डोंबिवलीत दोघांचा मृत्यू

two-youth-dead-by-drinking-tadi-at-dombivali

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : डोंबिवलीमधील कोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ताडीच्या अतिसेवनामुळे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यापैकी स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता, मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता.या प्रकरणी पोलिसांनी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.


डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.


यानंतर विष्णुनगर पोलिस ठाण्यात विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मृत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही ताडी पिऊन अजून दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here