नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : कोरोनाचे संकट कायम असले तरी, गेल्या वर्षीच्या आकुंचनातून बाहेर येत देशाची अर्थव्यवस्था यावर्षी वेगाने विकास साधेल, असा आशावाद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला. कोरोनाचा विषाणू उत्परिवर्तित होत असून या संकटावर मात करेपर्यंत निष्काळजीपणा करू नका, मुखपट्टीचा वापर, अंतरनियम पाळा, असे आवाहनही कोविंद यांनी केले.
दोन वर्षांत करोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता़ मात्र, गेल्या वर्षी सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला यश मिळू लागले आहे. कृषी व उत्पादन क्षेत्रातील सुधारणांमुळे प्रभावी आर्थिक कामगिरी करणे शक्य झाले आहे. छोटे शेतकरी उत्साहाने नैसर्गिक शेती करू लागले आहेत. लघू आणि मध्यम उद्योगांनी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कल्पक तरुण उद्योजकांनी नवउद्योगांसाठी (स्टार्ट-अप) पोषक वातावरण निर्माण केले आहे. भारताला सर्वोच्च ५० नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळाले आहे, असे कौतुकोद्गार कोविंद यांनी काढले.
देशाला या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने साजरा होत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या विविध कार्यक्रमांमध्ये तरुण उत्साहाने सहभागी होत आहेत. तरुण पिढीच नव्हे तर, सर्वासाठी देशाच्या भूतकाळाशी पुन्हा जोडण्याची ही उत्तम संधी आहे. स्वातंत्र्यलढा हा आपल्या वैभवशाली गाथेतील प्रेरणादायी अध्याय होता. स्वातंत्र्याच्या या ७५ व्या वर्षांत, आपल्या गौरवशाली राष्ट्रीय चळवळीला चालना देणारी मूल्ये नव्याने शोधली पाहिजेत, असे कोविंद म्हणाले.
राष्ट्रीय सेवेचे मूलभूत कर्तव्य पार पाडत कोटय़वधी लोकांनी स्वच्छ भारत मोहीम आणि करोना लसीकरण मोहिमेचे जनचळवळीत रूपांतर केले. अशा मोहिमा यशस्वी होण्याचे श्रेय कर्तव्यदक्ष नागरिकांना जाते, असेही कोिवद म्हणाले. लोकसंख्येच्या घनतेमुळे भारतात साथीच्या रोगाचे नियंत्रण अधिक कठीण होते. आपल्याकडे पुरेशी साधनसंपत्ती व पायाभूत सुविधा नाहीत. तरीही कोरोनाविरोधात अतुलनीय धैर्य दाखवत आपण आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचा विकास केला. स्वदेशी लस विकसित केल्या. इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. अन्य देशांनाही लस आणि इतर वैद्यकीय मदत देत आहोत. भारताच्या या योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केले जात आहे, असे उद्गार कोविंद यांनी काढले.
देशाच्या संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले व रावत यांना आदरांजली वाहिली. देशभक्ती नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना बळकट करते. तुम्ही डॉक्टर असो वा वकील, दुकानदार असो वा कार्यालयीन कर्मचारी, सफाई कर्मचारी असो वा मजूर असो, आपले कर्तव्य चोखपणे आणि कार्यक्षमतेने करणे हेच योगदान असते, असे ते म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे, असेही कोविंद म्हणाले.







