पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी येथील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसन क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असं मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना सांगितलं.
अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले होते.
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2017 सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला 12व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला होता.







