मुंबई गुन्हे शाखेने पकडल्या दोन हजाराच्या सात कोटी किंमतीच्या बनावट नोटा

mumbai-police-sized-fake-note

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : येथील गुन्हे शाखेने बुधवारी सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


काही लोक दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर येथे थडकले. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचला. आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवून त्यांची विचारपूस केली. तपासामध्ये आरोपींच्या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या गाडीत या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या २५ हजार नोटा होत्या.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून इतर आरोपींचीही माहिती मिळाली. हे सर्व हॉटेल अम्फा येथे थांबले होते. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेनं हॉटेलवर छापा टाकला. येथून पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.

या कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी एकूण सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. शिवाय एकूण सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेनं न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here