नाशिक (जेष्ठ प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव)
शरद जोशींनी शेतकरी आंदोलनांना सुरुवात केली ती चाकणच्या कांदा आंदोलनापासून. दोन आंदोलनं झाली. ‘रास्ता रोको’ व उपोषणाचा प्रथमच वापर या आंदोलनात झाला. शेतकरी सरकारविरुद्ध संघर्ष करायला तयार नसत. पोलीस बळाचा पाशवी वापर होत असे. तुरुंगवारी, जामीन, खटले यांचे शुक्लकाष्ट मागे लागत असे. पण शेतकरी संघटनेच्या छत्राखाली शेतकरी त्यांच्या पोटातील आगीमुळे आणि शोषणामुळे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे आक्रमक झाले. त्याने कांद्याला वाढीव दर मिळाला, निर्यातीवरील बंदी सरकारने मागे घेतली, हे तात्कालिक उद्दिष्ट साध्य झाले. पण या आंदोलनामुळे शेतक ऱ्यांच्या असंतोषाला वाट मिळाली आणि त्यानंतरचे प्रत्येक आंदोलन हे अधिक व्यापक होत गेले आणि शेतीमालाच्या किमतीचा आणि कृषी-अर्थकारणाचा प्रश्न देशपातळीवर राजकीय पटलावर गंभीरपणे आसनस्थ झाला. प्रत्येक आंदोलनाने आपापली किंमत चुकवली. अनेकांना तुरुंगवास घडला आणि काहींना हौतात्म्यही पत्करावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी आंदोलनांएवढी तीव्र, आग ओकणारी आंदोलनं दुसरी झाली नाहीत, असं लेखक भानू काळे म्हणतात. सरकारची दडपशाही मात्र तीच होती. गोरा साहेब जाऊन काळा साहेब आल्याने सरकार नावाच्या दडपशाही यंत्रणेत आणि वास्तवात काही फरक पडला नव्हता. या आंदोलनाने नंतर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. दिल्ली व पंजाबपर्यंत ते जाऊन पोहोचले. प्रादेशिक अस्मिता गळून पडल्या. जोशी देशपातळीवरील एक बलाढय़ शेतकरी नेते म्हणून उदयास आले. राजकारण्यांशी ते फटकून वागत असत. *आता जोशींना टाळणे सत्तारूढ व विरोधी पक्षांनाही अशक्य झाले.
या पुस्तकात अनेक छायाचित्रे आहेत. एका चित्रात शरद जोशींच्या समवेत एकाच व्यासपीठावर चंद्रशेखर, विश्वनाथ प्रतापसिंग आणि अटलबिहारी वाजपेयी हास्यविनोदात गर्क असलेले दिसतात* नंतर हे तिघेही देशाचे पंतप्रधान झाले* शरद जोशींच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे प्रतीकात्मक चित्र म्हणून त्याकडे पाहता येते.
सुरुवातीची काही वर्षे राजकारणापासून दूर राहिलेल्या, किंवा खरे तर घृणास्पद म्हणून राजकारण टाळणाऱ्या शरद जोशींनी- शेतक ऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर व्यवस्थेतच प्रवेश केला पाहिजे, इथपर्यंत प्रवास केला आणि स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. त्यामुळे समाजातील अंतर्विरोध प्रकर्षांने पुढे आले. जोशींना पाठिंबा असूनही या पक्षाला मात्र फारसे यश मिळाले नाही. स्वत: शरद जोशी एकदाही निवडून आले नाहीत. वाजपेयींच्या आग्रहामुळे त्यांनी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली. त्यावरून त्यांना टीकेचा भडिमार सहन करावा लागला. या आणि अशा अनेक घटना-प्रसंगांना या चरित्रात स्थान मिळाले आहे आणि त्याचे साधकबाधक विवेचनही काळे यांनी केले आहे. स्त्रियांचा संघटनेतील सहभाग, सातबाराच्या उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे केलेले प्रबोधन आणि लक्ष्मीमुक्तीचे आंदोलन ही प्रकरणे जोशींच्या वेगळ्या दृष्टिकोनावर यथोचित प्रकाश टाकतात हे खरेच; पण या चरित्रग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे लेखकाने सातत्याने घेतलेला जोशी यांच्या वैचारिक भूमिकेचा, त्यांच्या मूल्यधारणेचा शोध!
जोशी यांच्या वैचारिक व्यूहाच्या केंद्रस्थानी आहे ती त्यांची अर्थवादी भूमिका. शेती हा एक व्यवसाय आहे, त्यातून पुरेशी आर्थिक प्राप्ती व्हायलाच हवी, याविषयी ते ठाम होते. त्यांनी सातत्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. प्रत्येक गोष्टीचं कारण आर्थिक असतं. खुल्या अर्थव्यवस्थेत अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी सातत्याने केला. त्यांच्या स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना म्हणजे राजाजींच्या स्वतंत्र पक्षाचे पुनरुज्जीवनच होते लोकांना खूश करण्यासाठी किंवा राजकीयदृष्टय़ा सोयीची म्हणून डावी किंवा समाजवादी परिभाषा त्यांनी कधी वापरली नाही. डंकेल प्रस्तावाचे इतके उघड समर्थन भारतात तरी त्यांच्याशिवाय दुसरे कोणी केले नाही. भारतीय शेतक ऱ्याची लूट थांबविण्यासाठी त्याशिवाय पर्याय नाही, ही त्यांची खात्री होती. डंकेलमुळे शेतीमालाची सबसिडी जाईल, या आक्षेपाला त्यांचे उत्तर होते- की मुळातच भारतात शेतीला उणे अनुदान असल्याने ती कमी व्हायचा काही प्रश्नच नाही. ‘उलटी पट्टी’* हा त्यांनी लोकप्रिय केलेला शब्द हे भारतीय शेतीचे नेहमीचे वास्तव होते. जागतिकीकरणाच्या जमान्यात खुली अर्थव्यवस्था अपरिहार्य आहे आणि ती सर्वसामान्य ग्राहकाच्या भल्याचीच आहे, ही त्यांची भूमिका मतदारांनी स्वीकारली नाही, यातच जोशींचे राजकीय अपयश दडले आहे. पण त्यापलीकडेही श्रीजोशी उरतातच. याचे कारण शेतक ऱ्यांमध्ये त्यांनी जागविलेला स्वाभिमान व आत्मसन्मान. शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेल्या या क्रांतीचे अग्रदूत होते शरद जोशी!
(भानुदास काळे यांच्या जाणिवेतून)







