लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बदलत्या काळात, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जमान्यात लता मंगेशकर नामक स्वर्गीय सुराचं अव्वल स्थान अबाधित राहिल. या विश्वातही लता मंगेशकर यांचं गाणं आजही तळपतंय, आणि आजच्या पिढीवरही त्यांच्या अक्षय गाण्यांची मोहिनी आहे. जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोवर प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी वाजणारच. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गज़लांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांत कायमचा कोरला गेला आहे. आयुष्याची तब्बल ७ दशके त्यांनी गायलेला प्रत्येक सूर व शब्द पुढच्याच क्षणी हवेत विरून जात असला तरी रसिकांच्या कानात व मनात कायमचा साठवलेला आहे.
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत.. लता मंगेशकर हे नाव ‘गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे. इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक – मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ – इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा – इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालें यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज “अतिशय बारीक” म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते – येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरूवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील “मराठी” उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले.
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे – अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार मुखोपाध्याय, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)
संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.
इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला “सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका” म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले होते.







