गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पुणे (उपसंपादक सुरज घम) : येथील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश गजानन मारणे याने एका २२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून प्रथमेश गजानन मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २८ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे. पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिकत असून तिची आणि प्रथमेश गजानन मारणे याची ओळख होती. प्रथमेशने तिला खडकवासला परिसरात फिरायला नेले होते. घरी परतत असताना एका लॉजवर थांबून त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन प्रथमेशने तिच्या नकळत तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले.

हा प्रकार समजल्यावर तिने त्याला ते व्हिडीओ डिलीट करायची विनंती केली तसेच पोलिसांमध्ये तक्रार देईन, असे सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसुफ शेख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here