मुंबई-गोवा हायवेवर भरधाव कंटेनर पुलावरून थेट ८० फूट खोल नदीत कोसळला

mumbai-goa-highway-accident

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण पुलावरून भरधाव कंटेनर थेट नदीत कोसळला. या भीषण अपघातात चालक आणि क्लीनरचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कंटेनर गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता. त्याचवेळी हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा महेश ट्रान्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कंटेनर मध्यरात्रीच्या सुमारास खारेपाटण पुलावरून थेट सुख नदीत कोसळला. भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात वाहनचालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक किशन सुभाष (वय ३३, रा. उत्तर प्रदेश) आणि क्लीनर (ओळख पटली नाही) अशी दोघांची नावे आहेत.

कंटेनर औषधे घेऊन गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर खारेपाटण पुलावरून सुमारे ८० फूट खोल नदीत कोसळला. नदीत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. ग्रामस्थ, पोलीस, वनविभागाने बचावकार्य हाती घेऊन दोघांना बाहेर काढले. त्यानंतर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेले. तेथे या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.


खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी पोलीस नाईक उद्धव साबळे, होमगार्ड अमोल परब, भालचंद्र तिवरेकर, वन विभागाचे विश्वनाथ माळी, खारेपाटण ग्रामस्थ नितीन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, संदेश धुमाळे आदींनी तातडीने सहकार्य केलं. रात्रीची वेळ असल्याने मदत करताना अडचणी येत होत्या. या प्रकरणी पुढील तपास खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here