होळीनंतर ठाण्यात पारा तडकला; एसी, पंखे, कुलर हायमोडवर

summer-heat

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : होळीनंतर ठाण्यात आता पारा तडकला असून गरम वातावरणामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. काल बुधवारी ४४.१ एवढे तापमान होते. त्यामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. एसी, पंखे, कुलर हायमोडवर गेले.

सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कलिंगड विक्रेत्यांकडे अनेकांची पावले वळत होती. दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने मे महिन्यात काय होईल या विचारानेच अनेकजण घामाघूम झाले आहेत.

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा ३५ अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास ४० अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे. १६ मार्च रोजी ठाण्याचे तापमान हे ४४ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर ते तापमान कमी होईल असे वाटत असताना दुसऱ्याच दिवशी १७ मार्चला ४५.६ अंशावर गेले होते. हे आतापर्यंत ठाण्यातील सर्वाधिक तापमान असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here