परभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सेलू शहरात घरी एकट्या असलेल्या एका १२ वर्षीय मुलीवर २४ वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी वैभव बाबाराव कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी वैभव कदमला ताब्यात घेतले आहे.
आरोपी वैभव बाबाराव कदम (वय २४ वर्षे राहणार हमालवाडी सेलू) याने त्या मुलीवर ४ मार्चला बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्यावर घडलेल्या भयंकर प्रसंगाची माहिती आईला दिली. मात्र, समाजामध्ये आपली बदनामी होईल या भीतीपोटी मुलीच्या आईने तक्रार दिली नाही. घरामध्ये तणाव वाढत जात असल्याने अखेर मुलीच्या आईने मंगळवारी २२ मार्चला सेलू पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून आरोपी वैभव बाबाराव कदम याच्या विरोधात लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी वैभव कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली आहे.







