ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल ५ कोटी ६६ लाखांहून अधिक किमतीचे २ किलो ८२३ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) जप्त केले असून, या प्रकरणी ४ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
पहिली कारवाई घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉपजवळ केलेल्या कारवाईत मोजीम अब्दुल्ला शेख (४१), तबरेज अब्दुल्ला शेख (५१, दोघे रा. मिरारोड) यांच्यासह एका स्कूटरच्या डिकीतून एकूण १ किलो ६७१ ग्रॅम वजनाचा, ३ कोटी ३४ लाख २० हजार रुपये किमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे करत आहेत.
दुसरी कारवाई कोपरी परिसरातील बीएसएनएल ऑफिसजवळ अब्दुल रेहमान मोईद्दीन कादर शेख (३३, रा. गोवंडी) याला १ किलो १५२ ग्रॅम वजनासह (किंमत २ कोटी ३० लाख ४० हजार रुपये) अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यातील मुख्य साखळीतील (बॅकवर्ड लिंक) आफ्रिदी मोहम्मद वली शेख (२७, रा. सीवुड, नवी मुंबई) या पुरवठादारालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास म. सहा. पोलीस निरीक्षक सपना ताटे करीत आहेत.
जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ नेमका कोणाकडून आणला गेला आणि कोणाला विक्री केला जाणार होता, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. सह पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गायकवाड, सपना ताटे, प्रवीण फडतरे व पथकातील इतर अंमलदारांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.








