जळगावात माणुसकीचे दर्शन: जखमी गोविंदांवर मोफत उपचार करणारी ७७ वर्षांची परंपरा अविरत

मोफत उपचार

डॉ. अवधूत चौधरी यांच्या तीन पिढ्यांचा सेवाव्रत; सातपुड्याच्या वनऔषधींच्या लेपाने करतात उपचार

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) दहीहंडी फोडताना किंवा विविध खेळांदरम्यान जखमी होणाऱ्या खेळाडूंवर गेल्या ७७ वर्षांपासून पूर्णपणे मोफत उपचार करणारी परंपरा जळगावात आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. जुने जळगाव पांझरापोळ भागात स्थित असलेले डॉक्टर अवधूत नामदेव चौधरी आणि त्यांचे कुटुंब या अनोख्या सेवाव्रताच्या माध्यमातून माणुसकीचे उत्तम उदाहरण देत आहेत.

 

या परंपरेची सुरुवात डॉक्टर अवधूत चौधरी यांचे वडील, दिवंगत हडर्वेद्य नामदेवराव चौधरी यांनी केली होती. ते पूर्वीपासूनच दहीहंडीच्या उत्सवात थर रचताना किंवा फोडण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या गोविंदांवर कसलाही मोबदला न घेता मोफत उपचार करत असत. वडिलांचा हाच प्रेरणादायी वसा त्यांचे मोठे चिरंजीव डॉ. अवधूत नामदेव चौधरी यांनी पुढे चालवला आहे.

डॉ. अवधूत चौधरी यांना स्वतः खेळाची आवड असल्याने ते केवळ गोविंदाच नव्हे, तर कबड्डी, कुस्ती आणि क्रिकेट या खेळांदरम्यान दुखापत झालेल्या खेळाडूंवरही नियमितपणे मोफत उपचार करत असतात. या उपचारांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, डॉ. अवधूत चौधरी हे सातपुड्याच्या घनदाट जंगलातून विविध प्रकारच्या दुर्मिळ वनऔषधी स्वतः जमा करतात. या औषधींपासून खास लेप तयार करून त्याद्वारे ते जखमी रुग्णांवर पारंपरिक आणि प्रभावी पद्धतीने उपचार करतात. त्यांच्या या वैद्यकीय आणि समाजसेवेच्या प्रवासात त्यांची दोन्ही सुपुत्र डॉ. नितेश चौधरी आणि डॉ. स्वप्नील चौधरी हेसुद्धा तितक्याच उत्साहाने मोलाचा सहभाग नोंदवत असून, आता तिसरी पिढीही या सेवाकार्यात सक्रिय झाली आहे.

यंदाच्या दहीहंडीोत्सवानिमित्तही जळगाव शहर व तालुक्यात दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात किंवा सरावादरम्यान जे गोविंदा जखमी होतील, त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार आहेत. असे आवाहन डॉ. अवधूत चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले असून, गरजू खेळाडू व गोविंदांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here