प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन; मु. जे. महाविद्यालयात कार्यक्रम
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालक आणि मुलांमधील संवादाचा अभाव, वाढते गैरसमज व भावनिक दुरावा यामुळे कुटुंबव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याच अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आई-बाप’ या विषयावर विशेष व्याख्यान उद्या, रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशन, जळगाव यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मु. जे. महाविद्यालयातील कवी कालिदास सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या व्याख्यानात प्रा. वसंत हंकारे आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत पालक-मुलांचे नाते, संवादाचे महत्त्व, संस्कार, भावनिक गरजा आणि बदलत्या जीवनशैलीचा कुटुंबावर होणारा परिणाम या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, शिक्षण, करिअर आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. याचवेळी पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या भावविश्वामध्ये निर्माण होणारी दरी हा देखील चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर हे व्याख्यान युवक-युवती तसेच पालकांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे.
पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढावा, एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात आणि कुटुंबातील नात्यांमध्ये आपुलकी, विश्वास व समजूतदारपणा वाढावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील युवक-युवती, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.







