जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | मराठी विज्ञान परिषद, मुंबईतर्फे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘शनिवारी विज्ञान वारी’ या उपक्रमासाठी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातील आठ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, हे विद्यार्थी आता जळगाव शहरातील शाळांमध्ये जाऊन विज्ञान प्रयोग सादर करणार आहेत.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या अंतर्गत नुकतेच २९ व ३० ऑगस्ट दरम्यान चाळीसगाव येथील बी.पी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान मराठी विज्ञान परिषद मुंबईचे श्री. अभय यावलकर आणि सौ. जुईकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात विद्यार्थ्यांना ‘विज्ञान पेटी’ देऊन विज्ञान प्रयोग कसे करावेत याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी माध्यमातून विज्ञान प्रयोगांची मार्गदर्शक पुस्तिकाही भेट देण्यात आली.
चाळीसगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केलेले हे विद्यार्थी आता जळगाव शहरातील चार वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणार आहेत. तेथील ५ वी ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर शनिवारी विविध सोपे व आकर्षक विज्ञान प्रयोग सादर करून दाखवणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल व निवडीबद्दल नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाचे चेअरमन श्री. भालचंद्र पाटील, सचिव श्रीयुत डी. एस. भारंबे आणि सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







