मुंबई-आग्रा महामार्गावर क्रूजरवर रिक्षा आदळून तिघांचा जागीच मृत्यू

dhule-accident

धुळे (प्रतिनिधी) : येथील मित्रनगर भागात मुंबई-आग्रा महामार्गवर काल रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजर कारवर आदळली. हा अपक्षात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षा आणि क्रूजर कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

सोमवारी रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील क्रूजर कारमधील प्रवासी पारोळा तालुक्यातल्या तरडीहून पुण्याला लग्नासाठी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मध्यप्रदेशच्या दिशेने कांदा भरून नेणाऱ्या एका मालमोटारीने रस्त्यावर समोर असलेल्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली. यामुळे रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूजर कारवर जाऊन आदळली. यात अॅपे रिक्षा आणि क्रूजर गाडीचा चुराडा झाला. या अपघातात सरलाबाई पंडित सोनवणे (२९), रिक्षा चालक रईस शेख व महेंद्र चुडामन पाटील (५१) सर्व रा. तरडी (ता पारोळा जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या मदतीने जखमींना तत्काळ धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यात आली.

दरम्यान, या अपघातात विद्या भूषण कानडे (२१), सुरेश नारायण सोनवणे (६०), ताराबाई अशोक वसरे (५०), सुपडू बारकू वसरे (५५), कोयल प्रमोद सोनवणे ( १२), वसंत पंडित वंजारी ( ३३), प्रमोद रमेश सोनवणे (४५), सुधीर अभिमान पाटील (५४ ) आणि अरुणाबाई प्रमोद पाटील (४५) हे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here