जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : दोघात झालेल्या किरकोळ भांडणावरून दोन गटात हाणामारी होवून त्याचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील गवळीवाड्यात घडली. यात एक महिला जखमी झाली असून तिला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील मच्छीबाजारासमोर मंगळवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या भागातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले असून एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान गवळीवाड्यात दगडफेक झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहे. या दगडफेकीमुळे गवळीवाड्यासह परिसरात तणावपुर्ण शांतता असून दोन्ही गटातील संशयित आरोपींचे चौकशीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहे.







