गडचिरोलीत २ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १२ लाखांचे होते बक्षीस

2-nakshalwadi-sureender

गडचिरोली (प्रतिनिधी) : १२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सरकारने दोघांवरही प्रत्येकी सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

रामसिंग उर्फ सीताराम बक्का आत्राम (वय ६३) व माधुरी उर्फ भुरी उर्फ सुमन राजू मट्टामी (वय ३४) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. रामसिंग हा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली, तर माधुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी आहे. दोघांवरही खून, चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

सरकारने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पण केले.२०१९ ते २०२२ या कालावधीत आतापर्यंत एकूण ४९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छूक असतील त्यांना लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

रामसिंग हा २००५ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाल्यानंतर पेरमिली दलमचा सदस्य झाला. त्यानंतर तो अबुझमाडमध्ये तांत्रिक दलममध्ये कार्यरत राहिला. २०१२ पासून तो भामरागड एरिया तांत्रिक दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. माधुरी मट्टामी ही २००२ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. पुढे भामरागड दलम आणि सध्या पेरमिली दलमच्या एसीएम पदावर ती कार्यरत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here