राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला कार्यालयात घुसून मारहाण

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे पदाधिकारी अप्पासाहेब जाधव यांना त्यांच्या कार्यालयात येऊन मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अप्पासाहेब जाधव यांच्यावर भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आंबेकर यांच्या मारहाणीचा बदला म्हणून ही मारहाण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात संदीप उर्फ अप्पासाहेब जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोष कांबळे, अक्षय वरगडे, शुभम धोत्रे, वैभव कोटेकर, प्रदिप ससाणे यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांचे संपर्क कार्यालय नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर आहे. बुधवारी सायंकाळी जाधव कार्यालयात बसलेले होते. त्यावेळी संतोष कांबळे व साथीदार आले. त्यांनी जाधव यांना काय अप्पा म्हणत मिठी मारली. परंतु, त्यानंतर त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. कांबळे व त्यांच्यासोबत असलेले साथीदार मारहाणकरून कारमधून पसार झाले. तोपर्यंत या मारहाणीची माहिती वाऱ्यासारखी पसरली. यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या कार्यालय परिसरात तोबा गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपुर्ण झाले होते. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील येथे येऊन घटनेची माहिती घेतली. तसेच, पोलीस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली. पोलीसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी सोशल मिडीयावर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी टीकात्मक पोस्ट केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना त्यांच्या शुक्रवार पेठेतील कार्यालयात जाऊन धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी अप्पासाहेब जाधव यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता जाधव यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे ही मारहाण आंबेकर यांना झालेल्या मारहाणीचा बदला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here