नेपाळमध्ये २२ प्रवाशांसह विमान बेपत्ता, ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबातील चार जणांचा समावेश

Plane-with-22-passengers-missing-in-Nepal

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : नेपाळच्या पोखरा विमानतळावरून रविवारी सकाळी हवेत झेपावलेले ९ए-एईटी हे विमान २२ प्रवाशांसह गायब झाले आहे. प्रवाशांमध्ये ठाण्यातील माजीवडा येथील त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. टेक ऑफनंतर १५ मिनिटांतच विमानाचा पंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. हे विमान मुस्तांगच्या हिमालय क्षेत्रातील नदीकिनारी कोसळल्याची शक्यता आहे. खराब वातावरणामुळे विमानाचा शोध घेता आला नाही. त्यामुळे विमानातील प्रवासी सुखरूप आहेत की नाही, ही चिंता कायम आहे.

बेपत्ता विमानात ३ क्रू मेंबर्ससह एकूण २२ प्रवासी आहेत. त्यात ठाण्याच्या माजीवडा येथील रुस्तुमजी गृहसंकुलातील अथेना इमारतीत राहणाऱया त्रिपाठी कुटुंबाचा समावेश आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, ऋतिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी या प्रवाशांची नावे आहेत.

९ए-एईटी या विमानाने रविवारी सकाळी ९.५५ वाजता पोखरा येथून जोमसोमला जाण्यासाठी उड्डाण केले होते. जोमसोमला १० वाजून २० मिनिटांनी विमानाचे लँडिंग होणार होते, मात्र ११ वाजल्यानंतरही विमानाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वच सुरक्षा यंत्रणा हादरून गेल्या. काही तासांनंतर बेपत्ता विमान लाम्छी नदीच्या किनारी कोसळल्याचे स्थानिकांनी लष्कराला कळवले, परंतु अत्यंत खराब वातावरणामुळे शोधमोहीम मध्येच थांबवावी लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here