लोहोणेर ( प्रतिनिधी ) : वसाका कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम त्वरित मिळावी म्हणून वेळोवेळी मागणी केली असता कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने व जिल्हा बँकेने जमीन लिलावात काढल्याने आपल्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली असून या प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष न घातल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालया समोर फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपविणार असल्याचा इशारा वसाकाचे कर्मचारी रामदास संपत पवार यांनी दिला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे पवार कुटुंब व वसाका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत निवेदनात नमूद करण्यात आलेली माहिती अशी की, रामदास संपत पवार हे वसाका कारखान्यात १९९० पासून प्लंबर म्हणून काम करतात. त्यांना काही कारणास्तव कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र कामगार न्यायालयात केस दाखल करण्यात आल्याने त्यांना ८०% (टक्के ) पगार देऊन कामावर रुजू करण्याचा निकाल दिलेला असतांनाही त्यांना कारखान्याकडे घेणे असलेली रक्कम देण्यात आलेली नाही.
कारखान्याने कमी केल्यानंतर रामदास पवार हे उदरनिर्वाहासाठी शेती करत आहे. मात्र शेती साठी पुरेसे भांडवल नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँके कडून कर्ज घेतले. मात्र सदरचे कर्ज मुदतीत फेडू न शकल्याने रामदास पवार यांच्या जमिनीचा बँकेच्या वतीने दि. १२/४/२०२२ लिलाव करण्यात आला. थकीत रक्कम मिळावी म्हणून कारखाना विरुद्ध दोन वेळा अपील करण्यात आले. निकाल पवार यांच्या बाजूने मिळाला असतांनाही कारखान्याने दोन्ही ही निकालांचा अवमान केलेला आहे.
याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे वतीने २३/९/२०२१ रोजी पत्र देवुन सुद्धा कारखान्याने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. याबाबत रामदास पवार यांच्या मुलाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, यांना पत्र दिले असता मा. प्रादेशिक सह संचालक अहमदनगर यांना कार्यवाही करणे बाबत कळविले मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. कारखान्याने दि.३० मे पर्यत आपली थकीत रक्कम न दिल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालया समोर फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपविणार असल्याचा इशारा रामदास पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे पवार कुटूंबीय व वसाका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.







