जामनेर (प्रतिनिधी) : दोन मोटारसायकलींच्या भीषण धडकेत बाप-लेकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी जवळच्या धामणगाव बढे रस्त्यावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात प्रवीण नामदेव माळी वय (४५) व अतुल प्रवीण माळी ( १७, रा. देऊळगाव गुजरी, ता जामनेर) या बाप-लेकासह विलास भगवान गव्हाळ (२८, रा. खेडी पान्हेरा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण माळी आणि अतुल माळी हे मोटारसायकलने देऊळगाव गुजरी गावाकडे येत होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या मोटारसायकलवरील विलास आणि खालीद जमशेद तडवी (रा. रा देऊळगाव गुजरी) हे दोघे खेडी पान्हेरा गावाकडे जात होते. देऊळगावनजीकच या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात खालीद हा जखमी झाला तर इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
विलास हा खालीदकडे पाहुणा म्हणून आला होता. घटना घडली त्या ठिकाणी जंगल परिसर असल्याने मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. पहूरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, फत्तेपूर दुरक्षेत्राचे अनिल सुरवाडे, दिनेश मारवळ, प्रवीण चौधरी व किरण शिंपी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही जणांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तीन जणांना मृत घोषित केले. तर जखमी खालीद तडवी यास जळगाव येथे हलविण्यात आले आहे.







