ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : अंबरनाथ येथे सध्या दूध चोरांनी धुमाकूळ घातलाय. अंबरनाथ पूर्वेत गेल्या १० दिवसात दूध चोरीच्या ३ घटना घडल्या असून यापैकी एक घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.
अंबरनाथ शहरातील दूध विक्रेत्यांना दुधाच्या पिशव्या देण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी ट्रक येतो. हा ट्रक ठराविक ठिकाणी दुधाचे ट्रे उतरवून पुढे निघून जातो. यानंतर दूध विक्रेते पहाटेच्या सुमारास येऊन हे दूध घरोघरी वितरित करतात. दरम्यानच्या काळात ट्रे उतरवल्यापासून तिथे दूध विक्रेते लगेच येत नसल्याचं हेरून काही चोरट्यांनी दूध चोरी करायला सुरुवात केलीये.
अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरात समीर सावंत यांची विघ्नहर डेअरी आहे. या डेअरीच्या बाहेर असेच उतरवण्यात आलेले दुचाचे तीन ट्रे २ जून रोजी पहाटेच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चोरून नेले. यानंतर ३ जून रोजी दुधाचे ७ ट्रे, तर ११ जून रोजी दुधाचे ९ ट्रे चोरून नेण्यात आले. यापैकी २ तारखेची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन जण दुधाचे ट्रे उचलून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसतायत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शिवाजीनगर पोलिसांना सुद्धा देण्यात आले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात स्वारस्य न दाखवता तपास करून सांगतो, असं उत्तर दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं या घटनांकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष न करता या चोरट्यांना पकडून अद्दल घडवण्याची मागणी आता केली जात आहे.







