पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : बहिणीच्या दिराने केलेल्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या मागणीला विरोध केल्याने, त्याने तिची गल्लीमध्ये बदनामी केल्याने एका ३० वर्षीय महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिच्या नातेवाईकांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी रुपेश मिटर ऊर्फ सेन्डो पवार (वय ३२), अक्षना रुपेश पवार (वय २७), मिटर ऊर्फ सॅन्डो चॉकलेट पवार (वय ५५), अंजु ऊर्फ वंजा मिटर पवार (वय ४५, रा. पवार वस्ती, धनकवडी) यांच्यावर विमाननगरमधील यमुनानगर येथे राहणार्या २६ वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ ते १९ मे आणि १७ व १८ जून रोजी यमुनानगर येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांना दोन बहिणी आहेत. रुपेश हा फिर्यादी यांच्या बहिणीचा दीर आहे. त्याची पत्नी, आई, वडिल हेही आरोपी आहेत. रुपेश याने फिर्यादी यांची दुसरी बहीण हिच्याबरोबर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्यावर तिला टॉर्चर करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या दुसर्या बहिणीविषयी समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी केली. आपल्या भावजयीला फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या दुसर्या बहिणीची बदनामी केली. या प्रकारामुळे त्यांच्या बहिणीने १८ जून रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने अधिक तपास करीत आहेत.







